माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना, घाटकोपर (पूर्व), मुंबई
गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी त्यांच्या दिनांक 21 सप्टेंबर, 2023 रोजीच्या शासन निर्णय अन्वये मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको व म्हाडा इत्यादी अन्य महामंडळे/प्राधिकरणे/स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर (Joint Venture - JV) राबविण्यास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास मान्यता दिली आहे.
दिनांक 21 सप्टेंबर, 2023 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रमाबाई आंबेडकरनगर घाटकोपर पूर्व भू. क्र. 194 (भाग) व 195 (भाग) येथील अंदाजित 3,18,263 चौ. मी (31.82 हेक्टर) जमिनीवर व्यापलेली झोपडपट्टी ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याकरीता हाती घेतली आहे. या योजनेमध्ये सुमारे 17,000 झोपडीधारकांचा समावेश आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दि. 12 डिसेंबर, 2023 रोजी पार पडलेल्या 155 व्या बैठकीमध्ये ठराव क्र. 1667 अन्वये रमाबाई आंबेडकरनगर घाटकोपर पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही संयुक्त भागीदारी तत्वावर विकासक म्हणून राबविण्यास मान्यता दिली आहे.
त्याअनुषंगाने, दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्यामध्ये संयुक्त भागीदारी करार करण्यात आला आहे. योजनेसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विकासक म्हणून काम करणार आहे.
गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 31 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर योजना राबविण्याकरीता मान्यता दिली असून खालीलप्रमाणे कामांची विभागणी करण्यात आलेली आहे:
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून करण्यात येणारी कामे:
1. गृहनिर्माण विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे.
2. झोपड्यांचे सर्वेक्षण व पात्रतेसाठी Biometric सर्वेक्षण करणे.
3. कलम 3(C) अन्वये झोपडपट्टी क्षेत्र म्हणून जाहीर करणे.
4. कलम 14 (1) अन्वये खाजगी जागा अधिग्रहीत करणे.
5. परवानग्या, आशयपत्र, नकाशे, बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्रे देणे.
6. MMRDA कडून प्राप्त भाडे झोपडीधारकांना अदा करून मोकळी जमीन MMRDA कडे सुपूर्द करणे.
7. सहकार्य न करणाऱ्या झोपडीधारकांवर कलम 33 व 38 नुसार कारवाई करणे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येणारी कामे:
1. वास्तुविशारद व कंत्राटदार यांची नियुक्ती करणे.
2. विस्तृत व्यवहार्यता अहवाल व इमारतीचा नियोजन प्रस्ताव तयार करणे.
3. पात्र झोपडीधारकांना भाडे किंवा संक्रमण शिबिराची व्यवस्था करणे.
4. प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सादर करणे.
5. प्रस्ताव मान्यतेनुसार बांधकाम, पुनर्वसन, पीएपी, विक्री घटक यांची अंमलबजावणी करणे.
सदर योजनेच्या अंमलबजावणीमुळे सुमारे 17,000 झोपडीधारकांना 300 चौ. फूट चटई क्षेत्राची सदनिका विनामूल्य मिळणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिनांक 06 ऑगस्ट 2024 रोजी मे. संदीप शिक्रे & असोसिएट्स यांची वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून Biometric सर्वेक्षण पूर्ण करून परिशिष्ट-2 प्रकाशित करण्यात आले आहे. झोपडीधारकांसोबत वैयक्तिक करारनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने टप्पा-1 (6.6 हेक्टर क्षेत्र) करिता दिनांक 06/09/2024 रोजी आशय पत्र (LOI), 06 पुनर्वसन इमारतींसाठी 10/03/2025 रोजी मंजुरीची सूचना (IOA), दिनांक 28/03/2025 रोजी सुधारित आराखड्यास मान्यता दिली व दिनांक 13/02/2025, 06/06/2025, 11/11/2025 रोजी सुधारित आशय पत्र (LOI) निर्गमित केले आहे.
तसेच, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिनांक 24/05/2025 रोजी टप्पा-1 मधील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामासाठी कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा मागविल्या होत्या व निविदा प्रक्रियेअंती मे. बी. जी शिर्के कंन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रा. लि. यांना दिनांक 29/10/2025 रोजी सदर पुनर्वसन प्रकल्पाच्या टप्पा-1 मधील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामासाठी कंत्राटदार म्हणून नियुक्त केले आहे.
सदर पुनर्वसन प्रकल्पाच्या टप्पा-1 मधील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचे भूमिपूजन मा. मुख्यमंत्री. महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते दिनांक 14/10/2025 रोजी पार पडले.
पुढे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने टप्पा-1 मधील 12 इमारतींसाठी सुधारित मंजुरी सूचना (Revised -IOA) दिनांक 17/11/2025 रोजी निर्गमित केली आहे व दिनांक 09/04/2026 रोजी 12 पुनर्वसन विंग्सपैकी 6 पुनर्वसन विंग्ससाठी जोत्यापर्यंतचे (plinth) बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (Commencement Certificate) निर्गमित केले आहे, त्याअनुषंगाने टप्पा-1 मधील जागेवर कामाची सुरुवात करण्यात आली आहे.
| क्रमांक | Title | डाउनलोड/पाहा |
|---|---|---|
| 1 | शासन निर्णय : माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर, घाटकोपर (पूर्व) येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संयुक्त भागीदारीतुन राबविण्यास मान्यता - दिनांक ३१.०७.२०२४ | Download(153.88 KB) |
| 2 | शासन निर्णय : मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना महामंडळे/ प्राधिकरणे/स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर (Joint Venture - JV) राबविण्यास मान्यता - दिनांक 21.09.2023 | Download(893.51 KB) |



