संघटनात्मक तक्ता

श्री. शं. चं. देशपांडे
प्रमुख,
मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण
मिठी नदीचा उगम पवई आणि विहार जलाशयाच्या प्रवाहामधून होऊन, मिठी नदी मुंबई शहरातील दाट लोकवस्ती आणि औद्योगिक क्षेत्रांमधून वाहून शेवटी माहीम खाडी येथे अरबी समुद्रास मिळते. या नदीची एकूण लांबी सुमारे 18 किमी आणि पाणलोट क्षेत्र 7,295 हेक्टर इतके आहे. मिठी नदी ही एक नैसर्गिक निचरा वाहिनी असून जी पावसाळ्यात जास्त पाणी वाहून नेते. दि. 26 जूलै 2005 रोजी 24 तासांत मुंबई शहरांत 944 मिमी. झालेल्या विक्रमी पावसामुळे तसेच त्यादिवशी समुद्रास भरती आल्यामुळे 4.48 मी. उंचीच्या लाटांनी सर्व मुंबईला महापूराने वेढले.
नगर विकास विभाग, महाराष्ट्र्र शासन यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2005 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरण (MRDPA) नावाच्या स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना केली. प्राधिकरणाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहेत. मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक शक्ती प्रदत्त समिती स्थापन करण्यात आली आहे.
- मिठी नदी विकास आराखडा मंजूर करणे.
- मिठी नदी विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध प्रकल्पांना मान्यता देणे.
- मिठी नदी विकास आराखड्यात ठरवलेल्या कार्यांच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी करण्याऱ्या संस्था निवडणे.
- विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी शासकीय / निमशासकीय / इतर संस्थांच्या भूमिकांमध्ये समन्वय साधणे.
- मिठी नदी विकास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांनी केलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि संबंधित यंत्रणांना निर्देश देणे.
मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाची कार्ये :
महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 29.07.2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण हे मिठी नदी व वाकोला नाल्याच्या विकास संदर्भात विविध यंत्रणेमधील कामासाठी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे मध्ये समन्वयाचे काम करेल असे नमुद केले आणि असे स्पष्टीकरण केले की, मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणास वैधानिक दर्जा नाही व त्यामुळे मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणास भूसंपादन करणे, प्रकल्प ग्रस्तांचे पुनर्वसन करणे अशा स्वरुपाचे काम करण्याचे अधिकार नाहीत. यास्तव सदर मिठी नदी व वाकोला नाला ज्या क्षेत्रातून जातो, त्या क्षेत्रांच्या संबंधित अंमलबजावणी संस्थांनी मिठी नदी व वाकोला नाला विकासाच्या अनुषंगाने प्रकल्प अंमलबजावणी करणे, भूसंपादन करणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे व प्रकल्पाच्या अनुषंगाने इतर कामे करावयाची आहेत.
