मुंबई पारबंदर प्रकल्प
अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा- शेवा अटल सेतू (MTHL)
मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टीने अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू प्रकल्पाचा प्रस्ताव सुमारे 30 वर्षांपूर्वीपासून विचाराधीन होता. शासनाने दि.04 फेब्रुवारी, 2009 च्या शासन निर्णयान्वये या प्रकल्पाची मालकी व अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे असेल असे आदेशित केले. महाराष्ट्र शासनाने दि. 08 जून, 2011 च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे या प्रकल्पास प्रादेशिक विकास प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. सदर प्रकल्पामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे.
प्रकल्पाची माहिती: प्रकल्पाच्या वावामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 21.8 किमी लांबीच्या 6 पदरी (3 + 3 मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे
5.5 किमी इतकी आहे. प्रकल्पाची एकूण किंमत ₹17,843 कोटी इतकी आहे. कामास मार्च, 2018मध्ये सुरुवात झाली होती आणि दि. 05/01/2024 रोजी काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्पाचे फायदे: सेतू आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून, सदर प्रकल्पामुळे अपघातांची शक्यता कमी झाली आहे. तसेच, प्रवाशांना जलद आणि सुरक्षित मार्ग मिळाल्यामुळे त्यांच्या प्रवासाचा अनुभव सुखकर झाला आहे. सेतूच्या मदतीने शहरात आणि आसपासच्या भागात पर्यटनाचा विकास झाला आहे. व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रांना फायदा झाला असून, स्थानिक अर्थव्यवस्था अधिक बळकट होत आहे. अटल सेतूने वाहतुकीचे भार कमी करून मुंबई शहरातील स्थानिक रस्त्यांवरील दबाव कमी केला आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या रोजच्या जीवनात सुखसोयी मिळत आहेत.
प्रकल्पामुळे बांधकामाच्या काळात आणि उद्घाटनानंतर देखील अनेक स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. सदर सेतुचे बांधकाम करतेवेळी ऑर्थोट्रोपिक स्टील डेक ह्या तंत्रज्ञानाचा देखील वापर केल्याने फ्लेमिंगो पक्ष्यांच्या उड्डाण मार्गात अडथळा निर्माण होत नाही. वाहतुकीमुळे फ्लेमिंगोना होणारा त्रास कमी करण्यासाठी नॉईस बॅरिअर बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे या पक्ष्यांच्या संरक्षाणाच्या दृष्टिने प्राधान्य दिले जाते.
प्रकल्पाची सद्यस्थिती: सदर प्रकल्पाचे उद्घाटन मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 12.01.2024 रोजी करण्यात आले असून, प्रकल्प रहदारीसाठी दि. 13.01.2024 रोजी पासून खुला करण्यात आला आहे. सदर प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून अटल सेतूने मुंबई आणि नवी मुंबई यांमधील प्रादेशिक गतीत सुधारणा केली आहे, प्रवासाचा कालावधी कमी केला आहे आणि विद्यमान मार्गांवरील वाहतूक गर्दीत लक्षणीय घट केली आहे.