inner-banner

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल, दादर, मुंबई येथील भव्य स्मारक

राज्य शासनाने दिनांक 19 मार्च, 2013 रोजी दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिल क्र.6, येथील सुमारे 4.84 हेक्टर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती केली. तद्नंतर दिनांक 20 एप्रिल, 2013 रोजीच्या आदेशान्वये सदर स्मारकाच्या विकासासंदर्भात प्राधिकरणाने पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या विहीत केल्या. सदर स्मारक लोकांकरीता असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदरांजली असेल. दि. 11 ऑक्टोबर 2015 रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

मंजूर संकल्पनेनुसार संपूर्ण जागेची बगीचे असलेले शांती स्थळ म्हणून कल्पना केली आहे, ज्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबीत होईल. स्मारकामध्ये 100 फूट ऊंच पादपीठावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कांस्य धातूने आच्छादीत पुतळा असून पादपीठामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट व पुतळयाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी चक्राकार उतरंड (spiral ramp) आहे. या व्यतिरिक्त सुमारे 1000 आसनक्षमता असलेले प्रेक्षागृह, प्रदर्शनाकरीता दालने, संशोधन केंद्र, ग्रंथालय, ध्यानधारणा केंद्र, परीक्रमा पथ, स्मरणिका विक्री केंद्र, प्रतिक्षालय, उपहार गृह, प्रशासकीय कार्यालय, स्वच्छतागृह, बगिचे, वाहनतळ इत्यादींचा स्मारकामध्ये समावेश आहे.

विषयांकित स्मारकाचा भूखंड केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या मालकीचा असल्याने त्याचा ताबा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिनांक 25 मार्च, 2017 रोजी हस्तांतरणीय विकास हक्काच्या मोबदल्यात केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून घेतला आहे.

स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची उंची 350 फुटाऐवजी (250 फूट उंच पुतळा + 100 फुट उंच पादपीठ) 450 फूट (350 फूट + 100 फूट उंच पादपीठ) करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने सादर केलेल्या सुधारीत संकल्पनेस दिनांक 15 जानेवारी, 2020 रोजी मा. मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

शासनाने दिनांक 9 मे, 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्मारकाच्या कामाच्या सनियंत्रणाकरिता मा. मंत्री, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली आहे.

स्मारकाच्या विकासासाठी सुधारीत संकल्पनेनुसार बांधकाम नकाशे तसेच आवश्यक असणाऱ्या विविध मंजुऱ्या प्राप्त करण्यात आल्या असून स्मारकाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.